'राष्ट्रवादी क्रमांक एकचा असेल तर...' अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपारून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात कलगीतुरा सुरु झाल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. तर काँग्रेस लहान भाऊ असल्याचा उल्लेख केला होता. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.
आज सोलापूरमध्ये बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतात त्यात कांही गैर नाही. आजच्या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यामुळं विधान करण्यामध्ये कांही चुकीचं नाही. जागा वाटापामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन सूत्र वापरत होतो. आतापर्यंत जे जे निकाल आहेत त्याचा सारासार विचार करून जागा वाटपाचा निर्णय होईल. या घडीला भाजपाला कोणता पक्ष पराभूत करेल यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या स्टेटमेंटला फार काही विशेष अर्थ नाही, असं ते म्हणाले
काय म्हणाले होते अजित पवार?
20 मे रोजी कोल्हापूरमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम करायरचं आहे. आपली जास्त ताकद असेल तर मविआमध्ये महत्व टिकेल.
यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या त्यामुळे वाटाघाटी करताना लहान भाऊ म्हणून आम्हांला भूमिका घ्यावी लागायची. आता मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर आमच्या ५४ आहेत. हे असं गणित आहे.