पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर; जुळ्या बोगद्याच्या कामाचे होणार भूमिपूजन
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार, 13 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजता होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर लांब आणि 45.70 मीटर रुंदीचा जुळा बोगदा आहे. जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी 6.65 किलोमीटर आहे. हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160 मीटर खोल भागात असेल.
या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होईल. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण 14 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.