सर्वसामान्यांचं मुंबई महानगर क्षेत्रात घरांचं स्वप्न महागलं
मुंबई महानगर क्षेत्रात घरांचं स्वप्न महागलं
घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
वाढत्या मागणीमुळे घरांच्या किमतींमध्ये मोठी वाढ
घरांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने घरांच्या दरात वाढ
गेल्या काही वर्षांत मुंबई आणि परिसरातील घरांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशाचा असंतुलित विकास, त्यामुळे शहरांकडे वाढणारा ओढा, मुंबई महानगर प्रदेशातील जमिनीची उपलब्धता कमी होत जाणे, घरे कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती यामुळे आता घरांच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
सर्व महत्त्वाची प्राधिकरणे, उद्योगधंदे, नामांकित शैक्षणिक संस्था, रुग्णालये यांच्या अस्तित्त्वामुळे मुंबई शहराचे महत्त्व पूर्वीपासून इतर कोणत्याही शहरांच्या तुलनेत अधिक आहे. कालांतराने मुंबईला लागूनच असलेल्या पूर्व व पश्चिम उपनगरांचे महत्त्वही याच कारणांमुळे वाढत गेले. मुंबईवरचा भार कमी व्हावा म्हणून नवी मुंबई शहर उदयाला आले. आता तिथेही जागा शिल्लक राहिली नाही म्हणून तिसरी मुंबई उभी राहाते आहे. या सर्व बदललेल्या परिस्थितीनंतरही मुंबई शहर व उपनगराचे महत्त्व टिकून आहे.
अधिक चांगल्या जीवनशैलीच्या शोधात देशभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थलांतर केले आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागांतील घरांना मागणी वाढते आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईत घरे बांधण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने घरांची संख्या मागणीच्या तुलनेत कमी आहे.