मनसे कार्यकर्ते राजीनामा का देतात? प्रकाश महाजनांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "राज ठाकरे..."
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात मोठं भाष्य केलं. आगामी निवडणुकीत मनसे भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार आहे, असं राज ठाकरेंनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केलं. ठाकरेंच्या या भूमिकेमुळं मनसेत तर्क वितर्कांना उधाण आलंय. तसंच ठाकरेंच्या या भूमिकेचं काही नेत्यांनी स्वागत केलंय तर काही पदाधिकाऱ्यांकडून टीका होत आहे. मनसे प्रवक्ते किर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिल्यानं मनसेच्या गोटात खळबळ उडाली होती. अशातच आता मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला, त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार? मत वेगळी असली, तर पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत नसावीत, असं मला वाटतं. राजीनामा दिलेले कार्यकर्ते महत्त्वाचे लोक नाहीत.
माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक आहे. हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या देशाचं हित महत्त्वाचं आहे. हिंदुत्त्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. ३७० कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला. राम मंदिर झाले, हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेतही भारत पुढे आहे. हा सगळा विचार करूनच ठाकरे यांनी पाठिंबा दिला. प्रचाराला जायचं की नाही, याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. राज ठाकरे १३ एप्रिलला बैठक घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाजन म्हणाले, राज साहेब कुठे गेले याची चिंता बाकीचे का करतात? कर्णाची कवचकुंडले मागायला इंद्र येणार, ते त्यांना माहिती होतं. मात्र, काही लोकांनी शाल पांघरून हिंदुत्वाचं ढोंग घेतलं आहे. एनडीएची जाहीर सभा झाली, ते काय एकमेकांवर प्रेम ठेऊन आहेत का. केजरीवाल यांच्यासाठी उपोषणाला बसले.
शरद पवार यांनी राजीव गांधी यांना हिंदुत्वासाठी जयस्तुते म्हणायला लावले होते. अजित पवार यांच्यात झालेला बदल म्हणजे ते हिंदुत्वाला पाठिंबा देतात. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत बोलताना महाजन म्हणाले, काही भूमिका सतत बदलत असतात. मात्र, आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीही बदलली नाही. फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नातं जोडत नाही. अपेक्षा कोणतीही ठेवली नाही. आम्ही सगळे त्यामुळे तणावमुक्त आहोत.