'2004 सालीच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय...' प्रफुल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
2004 सालीच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय झाला होता. तर 16-16-16 च्या फॉर्म्युलानुसार लोकसभा लढवण्याचा निर्णय झाला होता असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल कर्जतमध्ये काल पार पडलेल्या अजित पवार गटाच्या शिबिराच्या पहिल्या दिवशी केला आहे.
ते म्हणाले की, 2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळी 16-16 -16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या घरी मीटिंग झाली होती. स्वतः प्रमोद महाजन माझ्या घरी होते. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं. त्यावेळीं गोपीनाथ मुंढे यांना लक्षात आलं की आपलं दिल्लीतल महत्त्व कमी होईल त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरे यांना माहिती लीक केली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी आडवी तिडवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा होती. नरसिंहरावांना हटवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्न केले. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरी यांना काँग्रेसचे अध्यक्ष केले. सहा महिने पूर्ण होतं नाहीत तोच केसरीने देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले सर्वांनी विनंती केली तुम्हीं केसरी यांना हटवा. त्यावेळी मला देवेगौडा यांचा फोन आला. मी देवेगौडा यांच्या घरी गेलो त्यावेळी ते म्हणाले, मी राजीनामा देतो फक्त केसरीला हटवा आणि शरद पवार यांनी भूमीका घ्यावी. मी शरद पवार यांना जाऊन सांगितलं आणि सांगितलं आपल्याला मोठी संधी आहे. परंतु 15 मिनिटांत त्यांनी बैठक संपवली आणि नंतर बोलू असं म्हणत सुवर्णसंधी गमावली. काय झालं मलाही कळलं नाही त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत ही खंत माझ्या मनात आहे. असं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात पाच महिन्यांपूर्वी मोठा स्फोट झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झाले. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदार-खासदारांना बरोबर घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत भाजपाशी हातमिळवणी केली. तसेच भाजपा-शिवसेना महायुतीत प्रवेश केला आणि ते सत्तेत भागीदार बनले. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्याबरोबरचे आठ आमदार मंत्री झाले आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे.