COF-999: कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी पावडर
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकीकडे जगभरात जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याची समस्या गंभीर आहे. तर दुसरीकडे औद्योगिकीकरण, दळणवळणाच्या साधनांमुळे वातावरणामध्ये जास्तप्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन केले जात आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत असं म्हटलं जातं.
हिरवी झाडे, वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. एक सामान्य मोठे झाड एका वर्षात हवेतून 40 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड शोषू शकते. मात्र, आता यूसी बर्कले येथील शास्त्रज्ञांनी एक अशा पावडरचा शोध लावला आहे की अर्ध्या पाउंडपेक्षा कमी वजनाची पावडर हे तेवढ्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊ शकते.
ही पावडर कसं काम करते?
फ्लफी पिवळ्या रंगाची ही पावडर आहे. हरितगृहातील वायूला शोषण्यासाठी या पावडरची रचना करण्यात आली होती. पावडरमधील सूक्ष्म छिद्रांद्वारे वायू शोषण्याचे काम ही करते. चाचण्यांमध्ये, ही पावडर हरितगृहातील वायू शोषून घेण्याचे 100 सायकल्स पूर्ण झाल्यानंतरही ही सामग्री उत्तम स्वरूपात असल्याचे नेचर्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
यूसी बर्कले येथील रेटीक्युलर केमिस्ट आणि संपूर्ण अभ्यासाचे वरिष्ठ लेखक ओमर याघी म्हणाले, "हे सुंदरपणे कार्य करते. आत्ताच्या सामग्रीच्या स्थिरता आणि वर्तनावर आधारित, आम्हाला असं वाटते की ते हजारोवेळा वापरता येईल." ग्लोबल वॉर्मिग कमी करण्यासाठी असे प्रयोग होणं गरजेचं आहे. जेणेकरून हवेतील कार्बन डायऑक्साईडची नैसर्गिक पातळीचा समतोल राखता येईल.