पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."
मोदी सरकारने ३७० कलम हटवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला काश्मीरमध्येही लागू केलं. तिथे असलेल्या दलितांना आरक्षणाचा अधिकार मिळाला. आदिवासींना,ओबीसींना आरक्षणाचा अधिकार मिळाला. आमच्या सरकारनेच माझ्या देशातील नागरिकांना मोफत रेशन, मोफत उपचार, पक्क घर, वीज, पाण्याच्या सुविधा देण्याचं काम केलं. काँग्रेसने कर्नाटकात सर्व मुस्लिमांना ओबीसी करण्याचा फतवा काढला. काँग्रेसने रातोरात ओबीसींना मिळालेल्या २७ टक्के आरक्षणावर डाका टाकला. काँग्रेसला संविधान बदलून हाच फॉर्म्युला पूर्ण देशात लागू करायचा आहे. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, जोपर्यंत जनतेचा मला आशीर्वाद आहे, धर्माच्या नावावर आरक्षण देण्याचा आणि संविधानाला बदलण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीला दिला. मोदी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभेत साताऱ्यात बोलत होते.
नरेंद्र मोदी जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, साताऱ्याची ही भूमी शोर्याची भूमी आहे. आपल्या सैनिकांकडे एकाहून एक जबरदस्त मेड इन इंडिया सामुग्री आहे. मोदींनी सैनिक कुटुंबाला आणखी एक गॅरंटी दिली होती. वन रँक, वन पेन्शनची गॅरंटी मोदींनी पूर्ण करुन दाखवली. काँग्रेसने सैनिकांना या योजनेपासून वंचित ठेवलं. काँग्रेसने गुलामीच्या मानसिकतेला देशभरात पसरवलं. गेले अनेक वर्ष नौदलाच्या झेंड्यावर इंग्रजांचं चिन्ह होतं. पण एनडीए सरकारने त्या इंग्रजांच्या चिन्हाला हटवलं. मोदींनी निश्चय केला, झेंड्याची ताकद तेव्हा वाढेल, जेव्हा झेंड्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिक असेल. आमच्या सरकारने मराठा सैनिकांनी बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांनाही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर समाविष्ट करण्यासाठी नामांकन केलं आहे.
महाराष्ट्राचा लोहगड, सिंधुदुर्ग किंवा मराठा सैनिकांनी बनवलेला तामिळनाडूचा जिंजी किल्ला या सर्वांना वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समावेश करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मराठ्यांची शान जगात पोहोचल्यावर आपल्या सर्वांना अभिमान वाटेल. जगात डंका वाजल्यावर आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. पण काँग्रेसला त्रास होतोय की, मोदी हे सर्व काम का करत आहेत, साताऱ्यात बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक कार्यात मोठं योगदान दिलं आहे. काँग्रेसने ७० वर्षांमध्ये ६० वर्ष देशात सरकार चालवलं. परंतु, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान जम्मू काश्मीरला लागू होत नव्हतं. ३७० ची भींत बनवली होती. तुमच्या आशीर्वादाने मोदींनी ३७० कलम हटवलं आणि कब्रस्तानात गाडून टाकलं.
तुम्हाला या गोष्टींचा अभिमान वाटतो की नाही, तुम्ही मला सांगा. ३७० कलम हटवून देशाची शान वाढली. मोदींनी तुम्हाला हा शब्द दिला होता आणि ती गॅरंटी आता पूर्ण केली आहे. जर देशातल्या दलितांना आरक्षण मिळू शकतो, देशातल्या आदिवासांना आरक्षण मिळू शकतो, तर जम्मू काश्मीरमध्ये माझ्या दलित, आदिवासी बंधूंना आरक्षणापासून वंचित का ठेवलं गेलं. तिथे संविधान लागू का केलं नाही. कारण वोट बँकेचं राजकारण तुमच्यासमोर उभं ठाकलं होतं.
जनतेचा उत्हास पाहून असं वाटतंय की, फीर एक बार मोदी सरकार..हे माझं सौभाग्य आहे. भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधान उमेदवार म्हणून घोषित केलं, तेव्हा मी रायगडच्या किल्ल्यावर गेलो होतो. कोणताही काम सुरु करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन केलं. त्या समाधीस्थळावरून मला प्रेरणा मिळाली. त्या पवित्र भूमीने मला आशीर्वाद दिलं, त्यामुळेच मी मागील दहा वर्ष त्याच आदर्श विचारांना सोबत घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.