"नवनीत राणांच्या विरोधात जे बोलतात, त्यांचा सुफडा साफ होणार", देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना इशारा
अमरावतीत ठाकरे गटाच्या सभेत खासदार संजय राऊत भाजप उमेदवार नवनीत राणा यांना नाची म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. भाजपने राऊतांच्या या विधानाचा निषेध व्यक्त केला असून वर्ध्याच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांवर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून नवनीत राणा १२ दिवस तुरुंगात राहिल्या. पण अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रसेचे नेते याठिकाणी येऊन महिलांबद्दल आणि नवनीत राणांबद्दल जे बोलत आहेत, त्याचा ही जनता समाचार घेईल आणि ह्यांचा सुफडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. ते रामदास तडस यांच्या प्रचारसभेत वर्ध्यात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, अल्पसंख्याक या सर्वांच्या जीवनात मुलभूत परिवर्तन झालं. या देशात मोदींनी ओबीसींचा विचार केला. मोदींच्या मंत्रीमंडळात ६० टक्के मंत्री ओबीसी, एससी आणि एसटी आहे. आमच्या बारा बलुतेदारांकरिता ३० हजार कोटींची योजना मोदींनी आणली. आदिवासी समाजासाठी २४ हजार कोटींची योजना मोदींनी आणली.
मोदींनी मोठ्या प्रमाणात उद्योग तयार केले. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून ८ लाख कोटी रुपये मोदींनी दिले. सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत. आता तिसऱ्यांदा मोदींना प्रधानमंत्री करायचंय. आपल्या सर्वांचं ठरलंय, अबकी बार मोदी सरकार. ४०० पार जाण्यासाठी वर्ध्यातून रामदास तडस यांना आणि अमरावतीत नवनीत राणांना आशीर्वाद द्या.
ही स्वातंत्र्याची भूमी आहे. ज्याठिकाणी पहिल्यांदा भारताचा झेंडा फडकला आणि स्वातंत्र्य घोषित केलं, ती ही भूमी आहे. महात्मा गांधींचीही वर्धा ही भूमी आहे. महात्मा गांधींनी सांगितलं होतं, आता देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, देशाला आता काँग्रेसची आवश्यकता नाही. काँग्रेसला विसर्जीत करा. पण काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही. वर्ध्याच्या लोकांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जीत करणं सुरु केलं, तरीही काँग्रेसचा पंजा इथे होता.
पण शरद पवारांचं आभार मानतो, कारण त्यांनी वर्ध्यातून काँग्रेसचा पंजा विसर्जीत केला. आता शरद पवार साहेबांनी वर्धा काँग्रेसमुक्त केलं. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नाही. पण ती अवस्था आता पाहायला पाहायला मिळत आहे. तुमच्या आर्शीवादाने रामदास तडस यांना हॅट्ट्रीक करण्याची संधी मिळेल, असंही फडणवीस म्हणाले.