'विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर बोलू नये' अजित पवारांची टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर बोलू नये, त्यांनी दीड रुपया तरी दिला का? ही योजना पुढे सुरू हवी असेल, तर महायुती सरकार पुन्हा आणावे लागेल. मी शब्दाचा पक्का आहे आर्थिक शिस्त मी लावू शकतो, अशी टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले की, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसने केवळ मते घेण्याचं काम केलं असून आमचं सरकार 24 तास काम करत आहे. आमचे मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे पाच वाजता उठून कामाला लागतो. याचाच अर्थ सरकार 24 तास काम करणारं असल्याचे अजित पवार म्हणाले.
एकोप्याने काम करा बघा आणि हा काम करेल, तो काम करेल असा अजिबात चालणार नाही. ते पुुढे म्हणाले की महामार्गामुळे कोल्हापूर शहरात पुराचे पाणी तुंबते. याबाबत आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो असून याबाबत लवकरच तोडगा काढू. ज्या विकासकामाला लोकांचा विरोध आहे ती कामे आम्ही करणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. खुर्चीच्या लालसेनं सत्तेत गेलो नाही, तर राजाच्या विकासासाठी सत्तेत आम्ही गेलो असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की कागल, चंदगड, गडहिंग्लजपुरतं मर्यादित राहून चालणार नाही. राष्ट्रवादीचे अनेक मतदारसंघांमध्ये आमदार राहिलेला हा जिल्हा आहे. ते दिवस आपल्याला परत परत आणायचे आहेत. पुढे महापालिका नगरपंचायत निवडणूक आहे त्यावेळी कस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनतेसमोर जात असताना विकासकामे समोर ठेवून जावा. मागे काय घडलं, कसं घडलं यावर टीका करण्याची गरज नाही. आपलं काम सर्व काही बोलून जातं, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले. शीतल फराकटे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. या टीकेला विरोध करताना अजित पवार यांनी फराकटे यांना सुनावले.