उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागले, जपानच्या पंतप्रधानांनी आणीबाणीचा दिला इशारा
उत्तर कोरियाने गेल्या काही दिवसांत शेजारील जपानवर अनेकदा क्षेपणास्त्रे डागली आहेत. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत उत्तर कोरियाने पुन्हा दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. गेल्या काही दिवसांत उत्तर कोरियाकडून एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याने शेजारी देश आता सतर्क झाले आहेत.
जपानमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शनिवारी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र डागल्याबद्दल आपत्कालीन इशारा जारी केला. त्याचवेळी दक्षिण कोरियानेही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर कोरियाने केलेले क्षेपणास्त्र प्रक्षेपण हे चिथावणीचे कृत्य असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
याबाबत आम्ही मित्र राष्ट्रांशी चर्चा करत आहोत, असे अमेरिकी लष्कराने म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरियाने यावर्षी 24 क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. उत्तर कोरियानेही क्षेपणास्त्र चाचणीबाबत निवेदन जारी केले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या अमेरिकेच्या लष्करी धोक्यांपासून स्वसंरक्षणार्थ घेतल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे शेजारील देशांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांनंतर नुकतेच उत्तर कोरियाने जपानवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. यानंतर उत्तर कोरियाकडून दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अलीकडच्या काही दिवसांत प्योंगयांगचे हे सातवे प्रक्षेपण होते, त्यामुळे जपान आणि दक्षिण कोरिया तसेच अमेरिकेची चिंता वाढली आहे.
जपानचे संरक्षण मंत्री तोशिरो इनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने डागलेली दोन क्षेपणास्त्रे 100 किलोमीटर उंचीवर पोहोचली होती. त्याने सुमारे 350 किमी अंतर कापले. जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ही दोन्ही क्षेपणास्त्रे सहा मिनिटांच्या अंतराने डागण्यात आली.