बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत मनसेची प्रतिक्रिया म्हणाले, "6 मे रोजी राज ठाकरे..."
कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.बारसूचे आंदोलन चिघळल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “कोकणात अशा प्रकारचे प्रकल्प येत असताना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, असं असलं तरीही येथील स्थानिकांना संपूर्णपणे विश्वासात घेऊन आणि त्यांच्यांशी चर्चा करून प्रकल्प आणले पाहिजे. कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरं आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. असे नितीन सरदेसाई म्हणाले.
तसेच ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. त्यावेळी याबाबतची सविस्तर भूमिका ते मांडतील. कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत. असे ते म्हणाले.