काँग्रेसने देशात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवलं - नितीन गडकरी यांचा हल्लाबोल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसने देशात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवल्याचा हल्लाबोल केला आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपाचे उमेदवार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
थोडक्यात
देशात इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी
काँग्रेसने देशात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवलं
ज्यांनी घटनेची ऐशी तैशी केली, तेच आता घटना घेऊन विषारी प्रचार करत आहेत
नितीन गडकरी यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
"देशात इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी"
या देशात पैशाची कमी नाही. मात्र इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची कमी असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. तसेच आपण 50 लाख कोटींची काम केली. पण कोणत्या ठेकेदाराला माझ्या घरी यायची गरज पडली नाही. मात्र, आज परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल. पण मला विचारल्याशिवाय करू नका अशी स्थिती असल्याचा टोला मंत्री गडकरी यांनी लगावला आहे.
"काँग्रेसने देशात जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवलं"
काँग्रेसने देशात नीती ऐवजी जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष कालवलं, असा आरोप मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
"ज्यांनी घटनेची ऐशी तैशी केली, तेच आता घटना घेऊन विषारी प्रचार करत आहेत", गडकरींचा राहुल गांधींवर निशाणा
स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पार्टीने घटनेची ऐशी तैशी केली. तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरोधात विषारी प्रचार करत असल्याची टीका नितीन गडकरींनी केली आहे. तसेच माणूस हा जातीने मोठा नसतो. तो गुणाने मोठा असतो. समाजातील अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होणं गरजेचं असल्याचं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.