'गुस्ताख-ए-नबी की सजा...'; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला धक्कादायक मेसेज
भोपाळ : रेल्वे रुळावर बी.टेकच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर समोर आलेल्या एका मोबाईल मेसेजनं मध्य प्रदेश पोलिसांची झोप उडवली आहे. सिवनी माळवा येथील रहिवासी निशंक राठौरच्या इन्स्टाग्राम आयडीवरून हा मेसेज त्याचे वडील आणि मित्रांपर्यंत पोहोचला होता. यामध्ये 'गुस्ताख-ए-नबी की एकही सजा, सिर तन से जुदा' असं लिहिलं आहे. भोपाळ-नर्मदापुरम बारखेडाजवळ रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांकडून हा खून असल्याचा आरोप केला जातोय. मात्र पोलिसांनी प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे.
मृत निशंक राठोड कोण होता?
मध्यप्रदेशच्या भोपाळ-नर्मदापुरम रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह हा निशंक राठौर नावाच्या विद्यार्थ्याचा असून, तो सिवनी माळवा भागातील रहिवासी होता. भोपाळमध्ये राहून तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. त्याचे वडील हरदा येथे सहकार विभागात काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, तो काही दिवसांपासून शहरातील शास्त्रीनगर, जवाहर चौकात मित्रासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. यापूर्वी तो सुमारे दोन वर्ष इंद्रपुरी परिसरातील वसतिगृहात राहत होता. निशंकचे फेसबुक प्रोफाईल तपासलं असता असं आढळून आले की, त्यानं प्रोफाईलमध्ये स्वतःला नॉएडा येथील सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्याचं सांगितलं आहे.
निशंकला दोन बहिणी असून मोठी बहीण रविवारी परीक्षा देण्यासाठी भोपाळला आली होती. निशंकच्या चुलत भावानं सांगितलं की, दुपारी तो बहिणीला भेटण्यासाठी साकेत नगरला गेला होता. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वडील उमाशंकर राठोड व काही मित्रांच्या मोबाईलवर धक्कादायक संदेश आले. निशंकच्या इन्स्टाग्राम आयडीवरून हे मेसेज आले आहेत. हे वाचून वडिलांना धक्काच बसला आणि त्यांनी निशंकला फोन लावला. मात्र निशंकने फोन उचलला नाही. त्यानंतर वडिलांनी मुलाच्या मित्रांना बोलावलं. त्यांनाही माहिती नसल्यानं पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, मिडघाट-बरखेडा परिसरातील रेल्वे मार्गावर कुणाचा तरी शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांना मिळाली. तपासात तो निशंक असल्याचं पोलिसांना कळलं.