चिपळूणमधील राड्यानंतर निलेश राणे भास्कर जाधवांना नको नको ते बोलले...

चिपळूणमधील राड्यानंतर निलेश राणे भास्कर जाधवांना नको नको ते बोलले...

भाजप नेते निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले.
Published by :
shweta walge
Published on

भाजप नेते निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेपूर्वी चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत काही दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर शेलक्या शब्दात भाष्य केलं. निलेश राणेला काही चालतं मात्र राणेसाहेबांना बोललेलं चालत नाही. शिवाजी पार्कवर सुद्धा राणीसाहेबांवर टीका केली. कणकवलीला आला तेव्हा टीका करून गेला. तू आमच्या शेपटीवर पाय दिलास तुला आम्ही सोडणार नाही. अशा आक्रमक शब्दांत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले.

काय म्हणाले निलेश राणे?

भास्कर जाधव यांनी यापुढे सभा घ्याव्यात. ते सभा घेतील, तिकडे मीदेखील सभा घेईन. पण तू राहिलास तर पुढची सभा होईल, असा गर्भित इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. भास्कर जाधव विनाकारण सगळ्या सभांमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करतात. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.

निलेश राणे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एक किस्सा सांगितला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राणे साहेबांना बोलावून घेतलं. ते म्हणाले की, 'नारायण आपल्याला काँग्रेसचे सरकार पाडलं पाहिजे'. तेव्हा राणे साहेबांनी बाळासाहेबांना शब्द दिला, यावेळी आपण सरकार पाडण्याचा प्रयत्न करु. तेव्हा राणे साहेबांकडे पैसे नव्हते, केवळ कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना गोरेगावाच्या मातोश्रीच्या क्लबमध्ये नेले. त्यावेळी पैसे नव्हते म्हणून राणे साहेबांनी घर गहाण ठेवले. पण त्यांनी कधीही बाळासाहेबांकडे पैसे मागितले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे नारायण राणे आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले.

सभेची गरज होती असं मला वाटत नाही. पण उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आले. कणकवलीला त्यांची सभा झाली. उद्धव ठाकरेंच्या सभेत भास्कर जाधव नको नको ते बोलले. निलेश राणेला काहीही चालत पण राणे साहेबांना वेड वाकडं बोलायचं नाही. आमच्या नेत्याला वेड वाकडं बोलायचं नाही, असे यावेळी निलेश राणे म्हणले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com