Nilesh Lanke: "...अशी मागणी करणं म्हणजे बालिशपणा"; खासदार निलेश लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा
Nilesh Lanke vs Sujay Vikhe Patil: अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खासदार निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात शाब्दीक चकमकी सुरुच आहेत. विविध राजकीय मुद्द्यांवरून सुयज विखे आणि लंके एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मतदानाबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतदान यंत्रांचे मॉकपोल होणार आहे. तत्पूर्वी निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले खासदार निलेश लंके?
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पडताळणीची मागणी करणं म्हणजे बालिशपणा आहे. वास्तविक लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि सुजय विखे यांचे वडील महसूलमंत्री असल्याने त्यांचाच अखत्यारीतील महसूल विभागाच्या हातात निवडणुकीचा सर्व कारभार होता. तरीदेखील त्यांनी अशाप्रकारे आक्षेप घेणं म्हणजे त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर आहे.
भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड पडताळणीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत निलेश लंके यांना विचारले असता त्यांनी विखे कुटुंबियांवर जोरदार निशाणा साधला. ईव्हीएमबाबत पाठराखण करणाऱ्या भाजपच्याच एखाद्या उमेदवाराने ईव्हीएमची पडताळणीची मागणी केल्याने, राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना लंके म्हणाले, विखे हे कोणाचेच नाही, हेच यावरून सिद्ध होतं.