नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक; सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
देशामध्ये 1 जुलैपासून लागू होणार असलेले नवीन फौजदारी कायदे आपल्या समाजासाठी ऐतिहासिक आहेत अशी प्रशंसा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी केली. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियाज प्रोग्रेसिव्ह पाथ इन द अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टी’’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत न्या. चंद्रचूड बोलत होते.
भारत आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेत लक्षणीय आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सज्ज आहे असे न्या. चंद्रचूड म्हणाले. नवीन कायद्यांमुळे भारताच्या कायदेशीर चौकटीचे नवीन युगात संक्रमण झाले आहे. तसेच पीडितांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि गुन्ह्यांचा कार्यक्षमपणे तपास करून खटला चालवण्यासाठी अत्यावश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत असेही सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितले. भारतीय न्यायिक संहिता, भारतीय सागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा संहिता, हे तीन नवीन कायदे यावर्षी 1 जुलैपासून देशात लागू करण्यात येणार आहे. या कायद्यांचे विधेयक 21 डिसेंबर 2023 रोजी संसदेने मंजूर केले. 25 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर स्वाक्षरी केली आहे.
मोदी सरकारने अलीकडेच मंजूर केलेल्या तीन नवीन कायद्यांचे त्यांनी जोरदार कौतुक केले. नवीन फौजदारी न्याय कायद्यांची अंमलबजावणी हा समाजासाठी एक महत्त्वाचा क्षण असून आता या कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांनी ते जबाबदारीने हाताळण्याची गरज असल्याने प्रतिपादनही केले. पीडितांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हांचा तपास आणि खटला कार्यक्षमतेने चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे नवे कायदे आपण नागरिक म्हणून स्वीकारले तरच ते यशस्वी होतील, असेही त्यावेळी म्हणाले.