Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंपाने हाहाकार;भारतातही जाणवले जोरदार धक्के
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळ पुन्हा एकदा भुकंपाने हादरला आहे. शुक्रवारी मध्यरात्री नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे. यामध्ये शेकडो इमारतींची पडझड झाली असून घटनेत आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. नेपाळच्या पीएमओ कार्यालयानेही ट्विट करुन नेपाळमधील भूकंपाची माहिती दिली आहे.
सध्या बचावकार्य सुरू असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. रुकूम पश्चिम जिल्ह्यात 36 आणि जाजरकोट येथे 20 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, जखमींची संख्याही मोठी असल्याचे समजते.
नेपाळच्या PMO कार्यालयानेही ट्वीट करुन घडलेल्या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच बचाव पथकांना घटनास्थळी पाठवल्यात आल्याचे सांगितले. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती, की यामध्ये शेकडो इमारती कोसळल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.