नेपाळचं बेपत्ता विमान मुस्तांगमध्ये आढळलं; नेपाळच्या लष्कराची माहिती
नवी दिल्ली : नेपाळमधून (Nepal) प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आता या विमानाचा लष्कराने (Nepal Army) शोध घेतला आहे. हिमालयातील मानापथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडले. 19 प्रवासी क्षमतेच्या या विमानात 4 भारतीय, 3 परदेशी आणि 13 नेपाळी नागरिक होते. विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात आला. खराब हवामानामुळे अपघात घडल्याची भीती असून, लष्कराला बचावकार्य कठीण जात असल्याची माहिती आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितलं की, नेपाळी लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येतेय. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची माहिती नेपाळ लष्कराकडून मिळाली आहे. विमान मानापथीच्या खालच्या भागात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, विमानाची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे सुद्धा अद्याप कळू शकलेलं नाही. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, हिमालयाच्या खालच्या भागात असलेल्या मनापथी येथे भूस्खलनामुळे तारा एअरचे विमान लामचे नदीवर कोसळले होते. नेपाळी सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजतंय.