मविआतल्या काहींनी सत्यजीतला मदत केली, “माझं मत आहे की त्यानं…”, सत्यजीत तांबेंना अजित पवारांचा सल्ला
नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठा विजय मिळवला. तर, महाविकास आघाडी समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,“मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे”, “त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये. असे अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत निवडून आल्यानंतर काँग्रेस, भाजपा त्यांच्या त्यांच्या पक्षाकडे त्याला बोलवायचा प्रयत्न करणार. सत्यजीतला पुढे त्याचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा. असे अजित पवार यांनी सांगितले आहे.