Nnaygaon BDD Chawl News
Nnaygaon BDD Chawl NewsTeam Lokshahi

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 206 पात्र गाळेधारकांची सदनिका निश्चिती

सदनिका निश्चितीसाठी म्हाडातर्फे संगणकीय आज्ञावली तयार करण्यात आली.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबई |संजय गडदे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या 206 पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. वांद्रे (Bandra) पूर्व येथील म्हाडा (MHADA) मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला समितीचे उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे संचालक सतीश आंबावडे, उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.           

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगाव येथील पोलीस विभागाच्या अखत्यारीतील इमारत क्रमांक 2 ब, 3 ब व 4 ब मधील गाळेधारकांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी हक्काने मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक (Randomised) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे आज निश्चित करण्यात आला. सदनिका निश्चितीसाठी म्हाडातर्फे संगणकीय आज्ञावली तयार करण्यात आली. 

Nnaygaon BDD Chawl News
मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे 4 डबे मुंबईत दाखल

नायगाव बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक 2 ब, 3 ब व 4 ब या पोलीस विभागाच्या अखत्यारीत आहेत. या तीन इमारतींमध्ये एकूण 238 निवासी व 2 अनिवासी गाळे/सदनिका आहेत. या निवासी गाळे/ सदनिकांमध्ये राहणाऱ्या 238 पैकी 206 पात्र गाळेधारकांची यादी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांनी 'म्हाडा'च्या मुंबई मंडळाकडे दिली आहे. या यादीतील 206 गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतीचा क्रमांक, इमारतीतील सदनिकेचा मजला, सदनिकेचा क्रमांक याची निश्चिती आज करण्यात आली.

सदर 238 गाळेधारकांना म्हाडातर्फे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी संक्रमण गाळ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे. प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/ रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com