नवनीत राणा भर कार्यक्रमात रडल्या...; नेमकं काय घडलं?
हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा यांना भर कार्यक्रमात अश्रू अनावर झाले.
नवनीत राणा म्हणाल्या, मी नेमका काय गुन्हा केला होता, ज्यामुळे मला १४ दिवस तुरुंगात काढावे लागले. एवढंच नाही तर आम्हाला एक महिना तुरुंगामध्ये ठेवणार होते. माझी लहान मुलेही मला विचारत होते तुम्हाला कशामुळे तुरुंगामध्ये ठेवले'', असं सांगत असतानाच नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर असलेले आमदार रवी राणा हे देखील भावून झालेले पाहायला मिळाले.
''उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना पक्षाची विचारधारा सांभाळता आली नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे देखील आश्रू ढाळत असतील'', असा टोलाही यावेळी नवनीत राणांनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'या निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दांपत्यांना अटक झाली होती. तेव्हापासून राणा कुटुंब हे ठाकरेंवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही.