कम्पाऊंडरने डॉक्टरला प्रश्न विचारले; नवनीत राणांचा पेडणेकरांना टोला
दिल्ली : राज्यात सध्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावरुन राजकीय रणकंदन पेटलं आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर पडलेल्या नवनीत राणांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी नवनीत राणांचे रुग्णालयातील एम. आय. आर. करतानाचे फोटो समोर आले होते. त्यानंतर शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि मनिषा कायंदे यांच्यासह अन्य काही लोकांनी लीलावती रुग्णालयातील प्रशासनाला फैलावर घेतलं. याला आता नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं.
राणा दाम्पत्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील त्यांच्या घरावरील संभाव्य कारवाईबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई महानगर पालिकेवर घणाघात केला. तसंच आपल्या रुग्णालयातील ट्रीटमेंटबद्दल जाऊन चौकशी करण्याचा अधिकार कुणालाच नाही असं म्हटलं. एक कम्पाऊंडर जाऊन डॉक्टरांना प्रश्न विचारते असं म्हणत त्यांनी किशोरी पेडणेकरांना टोला लगावला.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर टीका केली. यावेळी आमदार रवी राणा म्हणाले की, इंग्रजांनी लावलेली कलमे अनेक महान व्यक्तींवर लावण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्याने आमच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी इंग्रज काळापासूनच्या कायद्यावर मोठा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली, राज्यावरील अरिष्ट, साडेसाती टळण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार होतो. पण आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबले, राजद्रोहाचे कलम लावले.