'आता तरी हे थांबवा,राष्ट्रवादीपासून सुरूवात करते', सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती
सध्या अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ य़ांच्यात सुरू असलेल्या वादाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या वादावर राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा असून महिलांचा सन्मान करणारा आहे. ती महिला कोणाची तरी आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण आहे. त्यामुळे देवेंद्र जी माझ्या घरात जशी एक मुलगी आहे. तशी तुमच्या घरात देखील एक मुलगी आहे. त्यामुळे महिलांवरील आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे. गलिच्छ राजकारण थांबले पाहिजे. या सर्व घडामोडी लक्षात घेता, माझी देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण उपमुख्यमंत्री म्हणून पुढाकार घ्यावा. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निश्चितच पुढे येऊ, अशी मागणी त्यांनी केली.
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात वाद सुरू आहे. रुपाली चाकणकरांनी चित्रा वाघांवर पत्रकार परिषद घेत आरोप केले. त्याला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. एकटी म्हणजे आयोग हे डोक्यातून काढून टाका असा पलटवार चित्रा वाघांनी केला आहे. महिला आयोगाकडून उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना नोटीस देण्यात आली आहे.