National Herald Case : सोनिया गांधींची चौकशी होताच ED ची मोठी कारवाई!
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( National Herald case) सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. ईडीचे (ED) अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. (National Herald money laundering case)
कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान 10 जनपथवर झालेल्या बैठकीची कागदपत्रेही तपासली जात आहेत. या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या लोकांवर छापेही टाकले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 27 जुलै रोजी ईडीने सोनिया गांधी यांची सुमारे 11 तास चौकशी केली होती. ही चौकशी ३ दिवस चालली. यादरम्यान ईडीने सोनियांना हेराल्डशी संबंधित ४० हून अधिक प्रश्न विचारले होते. सोनियांपूर्वी ईडीने राहुल गांधींची ५० तासांहून अधिक चौकशी केली आहे.
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राची स्थापना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरुंनी केली होती. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL कंपनीची १९३७ साली स्थापना करण्यात आली होती. AJL कडून 'नॅशनल हेराल्ड' हे इंग्रजी वर्तमानपत्र, हिंदीमध्ये 'नवजीवन ' आणि उर्दुत 'कौमी आवाज' हे वर्तमानपत्र प्रकाशित केले जात होते.
याच वर्तमानपत्रांच्या कंपनीची खरेदी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या मालकीच्या यूथ इंडिया लिमिटेड YIL ने खरेदी केली होती. या व्यवहारात मनीलॉंडरिंग झाल्याचा आरोप भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींनी केला होता.
2014 मध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात कोर्टाकडून समन्स जारी करण्यात आले होते. यानंतर ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. त्याच वेळी, 2015 मध्ये, दोन्ही नेत्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टातून जामीन देखील मंजूर झाला आहे. त्याचवेळी, 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही नेत्यांना न्यायालयात सुनावणीदरम्यान प्रत्यक्ष हजर न राहण्याची परवानगी दिली, परंतु प्रकरण बंद केले नाही.
दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.