प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा संबंध काय; नारायण राणेंचा घणाघात
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आम्ही टीका करायला लागलो, तर त्यांना पळती भुई कमी पडेल. हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दोघांचीही पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. आपण कुठे आहोत आपल्या मागे किती लोक आहेत, आपल्यासोबत किती आमदार आणि खासदार आहेत हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी पहावे. हे आवळत चालले आहेत. ५६ आमदार होते आता १२ राहिले नाहीत, त्यांनी टीका करू नये. आम्ही टीका करायला लागलो, तर त्यांना पळती भुई कमी पडेल. हे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे लक्षात ठेवावं, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
शिवसेना आहे कुठे? शिवशक्ती व भीमशक्ती आहे कुठे? भीमशक्ती देशात आहे. पण, प्रकाश आंबेडकर आणि भीमशक्तीचा संबंध काय? किती दलित लोकांचे संसार बसवले हे प्रकाश आंबेडकर यांनी सांगावं. मी सांगतो मी किती दलित लोकांचे संसार बसवले, असे आव्हान नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांना दिले आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण प्रसंगी उद्धव ठाकरे गैरहजर राहिल्याने काही बिघडणार नाही. तैलचित्र लावणे कोणी थांबवणार नाही. उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊ नका. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं काही अस्तित्व नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला आहे.