शरद पवार आणि अजितदादा कधीही एकत्र येतील; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं विधान
थोडक्यात
: महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला, ज्यामध्ये भाजपला 132, शिवसेना (शिंदे गट) ला 57, आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला 41 जागा मिळाल्या.
महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवरच समाधान मानावे लागले, ज्यामुळे त्यांचे "पाणीपत" होण्याची परिस्थिती निर्माण झाली.
महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावर चर्चा सुरू असून, अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने याबाबत मोठं विधान केलं आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळाल. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. सध्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्याने एक मोठे विधान केले आहे. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात अस विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
ते म्हणाले की, “मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात”, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.
महायुतीला विधानसभेत यश मिळाल्यानतंर आता तिन्ही घटक पक्षांकडून सातत्याने आपापल्या नेत्यांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केली जात आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असा दावा केला जात आहे. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे नेमका कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.