"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा
Nana Patole Press Conference : सत्ताधारी पक्षांची शिवाजी पार्कमध्ये सभा होती. त्यांना बाहेरून लोकं आणावी लागली. त्यांना मुंबईचे लोक मिळाले नाहीत. ही परिस्थिती आपण पाहिली नाही. उद्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान आहे. चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीच मोठ्या संख्येनं पुढे आहे. उद्याच्या मतदानातही महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, तरुणांनी, महिलांनी, गरिबांनी महाराष्ट्र भाजपमुक्त करायचा, हे ठरवलेलं आहे. यासंदर्भातील निकाल येत्या ४ जूनला पाहायला मिळणार आहेत, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले.
नाना पटोले पुढे म्हणाले, राष्ट्रवादीत अंतर्गत काय चर्चा होत आहेत, यात काँग्रेसला पडायचं नाही. काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आमचे जे कुणी मित्रपक्ष आहेत, त्यांना सोबत घेऊन आणि भाजपसारख्या तानाशाहा सरकारला सत्तेतून बाहेर काढणं, हाच काँग्रेसचा मूळ उद्देश आहे. शरद पवार किंवा अजित पवार काय बोलतात, यामध्ये आम्हाला पडायचं नाही. भाजपने सत्तेच्या आधारावर राज्याला अधोगतीला नेण्याचं काम केलं आहे. पण काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात चांगले दिवस आणायचे आहेत. काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. राज्यात जी अवस्था झाली आहे, त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कुणी देशप्रेमी म्हटलं, तर त्यांच्यासाठी तो राष्ट्रद्रोह असतो. हिंदू देशप्रेमी आहेत. मुस्लिम देशप्रेमी आहेत.
शीखपण देशप्रेमी आहेत. देशप्रेमीला भाजप राष्ट्रद्रोह म्हणतात. पण त्यांच्याबद्दल चर्चा नाही केली, तर अधिक चांगलं होईल. ४ जूनला राज्यातल्या जनतेची मानसिकता काय आहे, हे पाहायला मिळणार आहे. मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसची भूमिका मांडली, ते पहता देशाचं संविधान वाचवणं हे आमचं पहिलं काम आहे. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच पक्षाकडे या देशाचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आली आहे, असंही नाना पटोले म्हणाले.