आगामी लोकसभेसाठी मविआचा फॉर्मुला ठरला? अशी असेल रणनीती
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात राज्यात मोठी चुरस रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. अशातच महाविकास आघाडीत असलेला ठाकरे गट मुंबईतील सहापैकी चार जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांवरआग्रही असल्याचं दिसत आहे. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा असून त्या सहा जागांसाठी महाविकास आघाडीचा 4-1-1 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठक मातोश्रीवर उद्धव ठाकरे घेत आहेत. अशातच मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील मध्य मुंबई, दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभांच्या जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू असून या दोन जागांसाठीचा उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. दक्षिण मध्य मुंबई ही जागा मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं निवडून आणली होती.