IPL 2024 : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा नारळ फोडला, स्टब्सची वादळी खेळी व्यर्थ, दिल्लीचा दारुण पराभव
आयपीएल २०२४ चा २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगला. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव झालेल्या मुंबईने आजच्या दिल्लीविरोधात झालेल्या सामन्यात अखेर विजयाचा नारळ फोडला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ विकेट्स गमावून २३४ धावांचा डोंगर रचला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सपुढं विजयासाठी २३५ धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने २ आणि गेराल्ड कोएट्जीने ४ विकेट्स घेत मुंबईला विजय मिळवून दिला.
त्रिस्टान स्टब्सच्या २५ चेंडूत ७१ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत ८ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा या सामन्यात २९ धावांनी विजय झाला. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने २७ चेंडूत ४९ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. इशान किशनने २३ चेंडूत ४२ धावा केल्या. इशानने ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. कर्णधार हार्दिक पंड्याने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या. टीम डेव्हिडने २१ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४५ धावांची नाबाद खेळी केली.
तर रोमारियो शेफर्डने चौकार षटकारांचा पाऊस पाडून १० चेंडूत ३९ धावा कुटल्या. यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. दिल्लीसाठी पृथ्वी शॉने ४० चेंडूत ६६ धावा केल्या. अभिषेक पोरेलने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या.