MPSCच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आझाद मैदानात ठिय्या
MPSC कृषी सेवा 2021 भरती प्रक्रियेतील 203 यशस्वी उमेदवारांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. भरतीत यशस्वी ठरल्यानंतरही शासनाकडून नियुक्तीसाठी विलंब होत असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या उमेदवारांनी केला आहे.
कृषी सेवा भरती परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप या नियुक्त्या करण्यात आल्या नाही आहेत. उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही या नियुक्त्यांमध्ये होत असलेला विलंबामुळे उमेदवारांनी आता बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शासनाकडून दीड वर्षांपासून 203 कृषी अधिकाऱ्यांना कृषी विभागात नियुक्त करून घेण्यास जाणूनबुजून टाळाटाळ होत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उमेदवारांनी 4 ऑक्टोबर पासून आझाद मैदानात नियुक्ती मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. या प्रकरणी शासनाने तातडीने निर्णय घेऊन उमेदवारांना नियुक्ती देऊन त्यांना तात्काळ न्याय द्यावा. नाहीतर नियुक्ती मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदोलक उमेदवारांनी दिला आहे.