खासदार विनायक राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शाब्दिक 'प्रहार', म्हणाले, "अर्ध्या हळकुंडात पिवळे..."
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विनायक राऊत राणेंवर शाब्दिक प्रहार करत आहेत. नारायण राणेंना अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही, तरीही बाशिंग बांधून प्रचाराला नाघाले आहेत. अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले आहेत. केंद्रीय मंत्री असूनही अजून नाव जाहीर होत नाही. त्यांच्या उमेदवारीने आम्हाला काही फरक पडत नाही. राणेंना तिसऱ्यांदा पराभूत करण्याचं भाग्य कोकणवासीयांना लाभणार आहे, असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर तोफ डागली आहे.
विनायक राऊत आणि राजन साळवींनी काय काम केलं,असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, आगामी निवडणुकीत नारायण राणे यांचं डिपॉझिट जप्त करुन आम्ही निवडून येऊ. म्हणजे विनायक राऊत आणि राजन साळवी यांनी काय केलं ते कळेल. राऊत पुढे म्हणाले, फक्त सिंधुदुर्गमध्ये ५० हजार मताधिक्याने मी त्यांना पराभूत करेन. तसच रत्नागिरी जिल्ह्यातून अडीच लाखांच्या फरकाने मी निवडणू येणार, हे मात्र नक्की. एकनाथ खडसेंवर बोलताना राऊत म्हणाले, खडसे खाल्लेल्या ताटात घाण करतात. पवारांकडून विधानसभा घेतात आणि पुन्हा भाजपमध्ये कशासाठी जातात आणि कशासाठी येतात, हे काय सांगता येत नाही.
मी 'शंभर दिवसात प्रकल्प' असं कुठेही बोललो नाही. त्यामुळे मला असं वाटतय की, नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. रिफायनरीला आजही माझा विरोध आहे आणि उद्याही राहणार. १४० कोटी जनता आहे, त्यापैकी ८० कोटी जनता आजही गरीब आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा अजेंडा मोदींनी दिला आहे. म्हणजे मोदी हे मान्य करत आहेत. आमच्या पक्षात किती आमदार आणि किती खासदार राहतील, याचा विचार तुम्ही करू नका, असंही विनायक राऊत म्हणाले.