Monkeypox जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर; WHO ची घोषणा
नवी दिल्ली : जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा (Monkeypox) वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (Health Emergency) म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस रिसोर्सेस गेब्रेयसस यांनी आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली.
जगभरात मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं पसरणाऱ्या संसर्गाबाबत डब्लूएचओकडून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या आढळली आहेत. तर, भारतातही आतापर्यंत तीन रुग्ण आढळले आहे. हे तीनही रुग्ण केरळमध्ये आढळून आले असून हे तिघेही जण आखाती देशामधून परतले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळावर स्क्रिनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, मंकीपॉक्स या विषाणूमुळे तापाच्या लक्षणांव्यतिरिक्त वेगळ्याच पद्धतीचे पुरळ उठतात. सहसा हे सौम्य असतं. यामध्ये दोन मुख्य प्रकारांचं वर्णन केलेलं आहे. यातला पहिला आणि अतिशय गंभीर प्रकार म्हणजे 'काँगो स्ट्रेन'. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्यामुळे 10 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. तसंच पश्चिम अफ्रिकेतला एक प्रकार आहे त्यामुळे १ टक्के लोकांचा मृत्यू होतो. मुख्यतः आफ्रिकेच्या पश्चिम आणि मध्य प्रदेशात हा विषाणू आढळतो. मंकी पॉक्सची बहुतेक प्रकरणं युनायटेड किंगडम, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये नोंदवली गेली आहेत.