Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

राज ठाकरेंच्या 'त्या' भाषणानंतर मनसेला दुसरा धक्का

कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा ही मनसेला रामराम
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांबाबत विधान केले. मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असे म्हणत त्यांनी आदेशच मनसैनिकांना दिले. यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यालयांवर लाऊडस्पीकर लावत मनसैनिकांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत लाऊड स्पीकर जप्त केले. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचे (MNS) राज्यभरातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेल्याची चर्चा आहे. पुण्यात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले असून कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी ही मनसेचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.

आगामी काळात पुण्यात मनसेला भगदाड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारी संध्याकाळी पुणे शहर कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवाण्यात आली आहे. या बैठकीत मनसेतील नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल, असे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील मनसेचे काही नगरसेवकही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे. यापैकी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, इतर नेते व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी अद्याप संभ्रम आहे. यानंतर कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी ही शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे मनसेचा राजीनामा सोपविला आहे.

पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com