मनसेनं थेट ED लाच पाठवलं पत्र; कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे हाती लागल्याचा केला दावा
मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप - प्रत्यारोप होताना दिसत आहे. या निवडणुकांच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. या निवडणुकामध्ये महविकास आघाडी, शिंदे गट, भाजपा तसेच मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनंही मुंबई पालिकेतलं राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी कंबर कसलेली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेनं आता थेट ईडीलाच पत्र लिहिले आहे. मनसेनें पत्रात लिहिले आहे की, “कोरोना काळात पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला गेला. कोरोना काळात चौकशीची मागणी होत होती. पण कंत्राटाची चौकशी करता येणार नसल्याचं पालिकेनं सांगितलं होतं. मनसेनं सुरुवातीपासून यासंदर्भात आवाज उठवला आहे. पण यावेळी घोटाळ्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला आहे”, तसेच “कोरोना काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली. त्यात मालाड व रिचर्डसन कुडास येथे करोना सेंटर्स उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेवण, लाँड्री, सेनिटायझर पुरवठा अशी कंत्राटं युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांनी तयार केलेल्या ठक्कर अड पवार कंपनी, शिवसेनी एंटरप्रायजेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अँड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया एंटरप्रायजेस, जय भवानी एंटरप्रायजेस व ग्रीन स्पेस रिएल्टी या कंपन्यांना देण्यात आले. या कंत्राटांमागे कुणाचा सहभाग होता, याची चौकशी होणं गरजेचं आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.
कोविड सेंटरमधील वेगवेगळ्या सेवांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र, आत्तापर्यंत घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मनसेनं आता त्यासंदर्भातला पुरावा हाती आल्याचं सांगितलं आहे.