भोंगे हटवा मोहिमेत मनसेनं टाकलं पुढचं पाऊल; सुजान नागरिकांना 'हे' आवाहन
मुंबई : राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या नव्या मुद्यामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मशिदीवरील भोंगे (Masjit Loudspeaker) काढा अन्यथा त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवू असा इशारा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिला होता. त्यानुसार आज अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. त्यानंतर आता मनसेने आता या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्याची तयारी सुरु केली आहे.
मशिदीवरील भोंगे काढण्यावरून सुरु असलेल्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भुमिका घेतली असून जोपर्यंत भोंगे काढले जात नाही तोपर्यंत त्यासमोर हनुमान चालिसा वाजवू असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात मनसेनं पुढच्या टप्प्याची तयारी सुरु केली आहे. भोगे हटवा मोहिमेत सहभागी होण्यासाठी मनसेने डिजिटल स्वाक्षरी अभियान सुरु केलं आहे. त्यानुसार मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन एक फॉर्म सुद्धा शेअर केला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, देशातील सजग नागरिकांनी, महाराष्ट्र सैनिकांनी मनसेच्या 'भोंगे हटवा' या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मनसेनं केलेलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं मनसेचं आंदोलन आगामी काळातही कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'मी सांगितलं होतं की भोंगे खाली उतरवा, पोलिसांना एकच काम आहे का रोज डेसिबल मोजायचं? लोकांनी हेच करायचं का? तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती करा, मात्र माईक आणि लाऊडस्पीकर लागतो कशाला? त्यामुळे हे भोंगे खाली उतरवले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही, यावर निर्णय लागत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे,' अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.