पहाटेच्या शपथविधीत शरद पवार यांच्यानंतर नरेंद्र मोदींचंही नाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. विरोधी पक्षांकडून हे दावे फेटाळण्यात येत आहेत. यावर आता शरद पवार यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शपथविधीपूर्वी चर्चा झाली होती, असा दावा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
काय म्हणाले प्रकाश महाजन?
देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शपथविधीपूर्वी तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेत काय घडलं होतं, नक्की कोणते मुद्दे होते, हे कळाल्यावर त्यातून काही गोष्टी समोर येऊ शकतील, असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी दावा केला आहे. ते यावेळेस औरंगाबादमध्ये बोलत होते.
पहाटेचा शपथविधी हे अजित पवार यांचं बंड होतं तर शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं दिलं. फक्त गृहखातं दिलं नाही.
शरद पवार माघारी का वळाले? असा प्रश्न आहे. राष्ट्रवादीतला एक गट यांनी शरद पवार यांना पटवून दिलंय, की पावसात भिजवून जे कमावलं, ते अशा शपथविधीवरून जाऊ शकतं. त्यांनीही विचार केला असेल. एक डाग १९७८ चा आपण ४० वर्षापासून घेऊन वावरत आहोत. याचा विचार करून शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत, असं वक्तव्य प्रकाश महाजन म्हणाले आहेत.