लोकसभेत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता, विधानसभेत भूमिका का बदलली? राज ठाकरेंनी थेट सांगितलं, म्हणाले...
Raj Thackeray Press Conference: लोकसभेला मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. आता विधानसभेत वेगळी भूमिका घेतली आहे, यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी मी सांगितलं होतं की ही युती लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. त्यानंतर मी विधानसभेबाबत काहीही बोललो नाही. मोदी सरकार आल्यावर महागाई, भ्रष्टाचार थांबवू ही आश्वासनं दिली होती. बरोजगारी संपवू असंही सांगितलं होतं. पण सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत, यावर ठाकरे म्हणाले, २००९ ची माझी भाषणं काढून बघा. त्यावेळी कुणी मला साथ दिली नाही. १९८४ ला राजीव गांधींना जे बहुमत मिळालं, त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं. ३० वर्षानंतर हे झालं आहे. आपण निवडणुकीच्या आधी काय बोलतो आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतोय? याचं भान सुटलं की असं होतं. याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही आहेत.
महाराष्ट्रातील नेते एकमेकांना एकेरी भाषेत सुनावतात. राजकारणाचा स्थर खालच्या पातळीवर चाललाय का? या प्रश्नाचं उत्तर देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, मी या विषयावर अनेकदा बोललो आहे. तुम्ही या लोकांना प्रसिद्धी द्यायचं बंद करा. या सोशल मीडियामुळं डोकी फिरली आहेत. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं. ही पहिली जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे.
महाराष्ट्राचा मणिपूर केव्हा होईल, हे सांगू शकत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. महाराष्ट्रात अशी परिस्थितीत खरंच आहे की त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केलं आहे, यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं, शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे.
महाराष्ट्रात इतक्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की या महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या सर्व भागात फ्लायओव्हर्स, पूल आणि इतर सर्व गोष्टी होत आहेत. या सर्व गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी होत नाहीत. बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होत आहेत. ठाणे जिल्ह्यात ७ ते ८ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायतपासून महानगरपालिकेपर्यंतचे सर्व स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात.
एका जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका असतील, मग ही लोकसंख्या ठाण्यातल्या लोकांनी वाढवलीय का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा किती मोठ्या प्रमाणावर आहे. मग ते इथे आल्यावर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा इतका पैसा खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, असंही राज ठाकरे म्हणाले.