भाजपची रणनिती तयार; प्रसाद लाड, निरंजन डावखरे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला
मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजपची रणनिती तयार असून, त्यासाठी त्यांनी रणनिती देखील आखली आहे. त्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांनी आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. लाड आणि डावखरे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कार्यालयात आज 2 वाजता ही भेट घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड या दोघांमध्ये मोठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. 14 जून रोजी सर्वात आधी काँग्रेसचे भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन बविआ चे 3 मतं देण्याची विनंती केली होती.
हितेंद्र ठाकूर यांची तीन मतं राज्यसभेच्या निवडणुकीतंही चांगलेच भाव खाऊन गेले होते. त्यानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा या मतांना चांगली किंमत आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मतांसाठी यापूर्वी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, विधानपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा ठाकुरांच्या भेटी घेऊन त्यांना मागितलं आहे. त्यातच आज स्वत: प्रसाद लाड हे सुद्धा विरारच्या विवा कॉलेजमध्ये दाखल झाले. ठाकुरांनी मात्र राज्यसभे प्रमाणेच विधानपरिषद मध्ये आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपने तीन उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला धूळ चारली. या निवडणुकीत ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात तुरुंगात असलेल्या नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर आता या दोघांना विधान परिषदेलाही मतदान करता येणार नाहीये. विधान परिषदेचं मतदान हे येत्या 20 जुनला होणार असून, 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत आता भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.