पुतण्याकडून झालेल्या अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातातआमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं असल्याची माहिती मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यात कळंब गावच्या हद्दीत आमदार पुतण्याच्या गाडीने रात्री 11.40 वाजता दोघांना चिरडलं आहे.
पुतण्या मयूर मोहिते दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, काल जो रात्र अपघात झाला. तो रात्रीच्यावेळी झालेला अपघात आहे. अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला. त्यावेळी मी माझ्या पुतण्याला स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितले. पोलिसांनी अटक केलेली नाही. मी स्वत:हून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, या सगळ्या गुन्हाची चौकशी पोलीस करत आहेत. जोपर्यंत पोलीसांचा तपास होत नाही. नेमकं कोण दोषी आहे हे पोलीस शोधत नाहीत तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल. माझा सख्खा पुतण्या जरी असेल आणि त्याने चूक केली असेल जे काही कायद्याच्या परिभाषेत शासन होईल त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप नाही. काल त्याठिकाणी अपघात झाल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे जोपर्यंत त्याचा तपास लागत नाही की चूक नेमकी कुणाची आहे. तोपर्यंत कुणीच काही सांगू शकत नाही. असे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले.