'शासकीय योजनांची जत्रा' कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ द्या - कृषिमंत्री अब्दुल सत्तार
अनिल साबळे|सिल्लोड: गावातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचला जावा या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबविण्यात येतआहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्याचे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून सदरील अभियानाचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासह एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजने पासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आज शुक्रवार ( दि.5 ) रोजी शहरातील स्वस्तिक लॉन्स येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली ' शासकीय योजनांची जत्रा ' या अभियानाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करीत असतांना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचला पाहिजे. प्रत्येक गावनिहाय, तालुकानिहाय, नियोजन आराखडा तयार करावा , प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्या योजनांचा आराखडा तयार करावा. वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून दिला जावा,शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाची रुपरेषा, जबाबदारी, लक्ष्य, कार्यक्रम व टप्पे याबाबत प्रभावी नियोजन करा, शासकीय योजनेची जत्रा हे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकारी - लोकप्रतिनिधी यांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करा अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी अनेक योजना आहे . मात्र त्यांची नोंदणी नसल्याने ते शासकीय योजनेपासून वंचित राहतात. त्याचप्रमाणे मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे, मात्र काही जणांची नोंदणी नाही यासाठी कामगार तसेच मतदार नोंदणी करण्यावर भर द्या , लोकसभा, विधानसभा नंतर ग्रामसभेला तितकेच महत्व आहे याबाबत गावागावांत जनजागृती करा असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, जलसंधारण विभागाचे यतीन कोठावळे,श्रीधर दांडगे, सिंचन विभागाचे गजानन जंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजयकुमार सोनवणे, मुख्याधिकारी सय्यद रफिक, सुनील गोराडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, तालुका आरोग्य अधिकारी नासेर पठाण, वीज वितरण विभागाचे सचिन बनसोडे तसेच महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, सुमनबाई तांगडे, माजी सभापती डॉ. संजय जामकर, रमेश साळवे, अशोक सूर्यवंशी, पांडुरंग दुधे, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, सतीष ताठे, सयाजी वाघ आदिंसह कृषि, ग्रामविकास, महसूल विभागांसह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध गावचे सरपंच उपस्थित होते.