Mig 21 crash : राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळलं हवाई दलाचं विमान; दोन्ही पायलटचा...
राजस्थानच्या बाडमेरमध्ये हवाई दलाचं MIG हे लढाऊ विमान कोसळलं आहे. MIG विमान क्रॅश झाल्यानंतर या त्याला आग लागल्याची माहिती आहे. प्रशासनाची पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत. मिग अपघातानंतर 1 किलोमीटरच्या परिसरात त्याचे अवशेष पसरले आहेत. बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडा गावात हा विमान अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे मिग-21लढाऊ विमान कोसळलं. जिल्हाधिकारी लोकबंधू यादव यांनी सांगितलं की, ही घटना भीमडाजवळ आणि जिल्ह्यातील बायतू पोलीस ठाण्यांतर्गत घडली. विमान लोकवस्तीपासून काही अंतरावर कोसळल्यानंतर आगीमुळे पूर्णपणे नष्ट झालं. ते म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विमानात दोन पायलट होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला असं सांगून जिल्हाधिकारी लोकबंधू यादव म्हणाले की, आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासह हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिस, प्रशासनाव्यतिरिक्त हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचल्याचं सांगण्यात येतंय.