Megablock : मुंबईकरांनो बाहेर पडताना काळजी घ्या; तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
कुठे : ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
कुठे : कुर्ला- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत हार्बरमार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
कुठे : बोरिवली – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर
कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान
ब्लाॅक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत . तसेच, या ब्लाॅकमुळे 25 मार्च रोजी अहमदबादहून सुटणारी गाडी क्रमांक 19418 अहमदाबाद – बोरिवली एक्स्प्रेस विरारपर्यंत चालवण्यात येईल.