प्रवाशांचे होणार हाल; आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

प्रवाशांचे होणार हाल; आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! माटुंगा-मुलुंड आणि कुर्ला-वाशी मार्गांवर रविवारी (17 नोव्हेंबर 2024) मेगाब्लॉक. प्रवासाच्या आधी वेळापत्रक तपासा.
Published by :
shweta walge
Published on

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बामती आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (17 नोव्हेंबर 2024) ब्लॉक घेतला आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान ब्लॉकचे नियोजन केले आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी (ता.१७ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी तुम्ही जर आवश्यक कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिकेवर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबविल्या जातील आणि माटुंगा स्थानकापासून पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

विशेष लोकल चालविण्यात येणार

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि कुर्ला-पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे- वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ते रविवारी (ता.१७ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धीमी आणि हार्बर मार्गिकेवरील सेवा विस्कळीत होणार आहे. तर ब्लॉक कालावधीत राम मंदिर स्थानकात गाड्या थांबणार नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com