संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
सर्व वारकरी भाविक भक्तांना आता आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत असतात. यावर्षी 23 नोव्हेंबर पासून माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरु होत आहे. माऊलींचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेच्या कार्यक्रमाची पत्रिका जाहीर झाली आहे.
थोडक्यात
728 वा संजीवन समाधी सोहळा यंदा 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान
23 नोव्हेंबर रोजी परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारवर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होणार
सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 12.30 च्या दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने
आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा यंदा 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलाची पालखी काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. या संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल होतात.
आळंदी देवस्थानच्या वतीने संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. या सोहळ्याची सुरुवात 23 नोव्हेंबर रोजी परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारवर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होणार आहे. तर मुख्य संजीवन समाधी सोहळा हा 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान होणार आहे. तर सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 12.30 च्या दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होणार आहे. या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज पवमान अभिषेक, दुग्धारती, महापूजा, नैवद्य, भजन, कीर्तन, पारायण हे परंपरेनुसार होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.