Pavel Durov: टेलिग्रामच्या संस्थापकाविरोधात मोठी कारवाई; पावेल ड्युरोव यांना पॅरिसमध्ये अटक
टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पावेल ड्युरोव यांना 25 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आले. पॅरिसमधील बौरगेट विमानतळावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ड्युरोव हे आपल्या खासगी विमानाने प्रवास करत होते. चौकशीसाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.
टेलिग्राम कंपनीत मॉडरेटर्स नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मॉडरेटर्स नसल्यामुळे टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर गुन्हेगारीविषयक कृत्य उघडपणे चालत होते, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, पावेल यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
टेलिग्राम हे समाजमाध्यम भारतातही लोकप्रिय आहे. अनेक लोक हे माध्यम मेसेजिंगसाठी वापरतात. व्हॉट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम अशी माध्यमं टेलिग्रामचे मुख्य स्पर्धक आहेत. सध्या चालू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्ध क्षेत्रात टेलिग्रामचा वापर फार वाढलेला आहे.