Covid 19 : राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांची माहिती
मुंबई : देशातील अनेक भागांत सध्या कोरोना (Covid19) रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली (Delhi) आणि उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काही शहरांत त्यामुळे मास्क (Mask) सक्तीचा निर्णय देखील घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील आरोग्य विभाग पुन्हा एकदा सतर्क झाला असून, त्यानुसार महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज या पार्श्वभूमीवर महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती सारखे नियम लागू करावे लागणार आहे.
राज्यात सध्या २५ हजार लोकांची दररोज टेस्टींग सुरु आहे. महाराष्ट्र सध्या सेफ झोनमध्ये आहे, घाबरण्याचं आणि पॅनिक होण्याचं कुठलंही कारण नाही. मिझोरम, दिल्ली, केरळ, उत्तराखंड या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दर १० लाखांमध्ये फक्त ७ केसेस आहे. मात्र काळजी घ्यावी लागणार असून, टेस्टींग आणि ट्रॅकींग वाढवू असं राजेश टोपे यांनी सांगितलं. देशात सध्या ओमिक्रॉन हाच व्हायरस आहे. त्याचा कुठलाही वेगळा प्रकार नाही. त्यामुळे घाबरण्याची कारण नसून, लसीकरण देखील योग्य प्रमाणात झालं असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहे. तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शाळा प्रशासन आणि पालकांना विश्वासात घेऊन काम करावं लागेल असं राजेश टोपे म्हणाले आहेत.