आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष चपळगावकरांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
भूपेश बारंगे|वर्धा: बालकांनो आयुष्य खुप सुंदर आहे, शिका, खुप मोठे व्हा! पण, या जीवनप्रवाहात मायबोली मराठीचाही सन्मान राखा. मातृभाषा आपल्याला विचार सामर्थ्य देते. आपले विचार प्रगल्भ असले तर आचारही त्यानुसार बदलतात,असा मौलिक सल्ला ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वर्ध्यातील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्यावतीने शहरातील रामनगरस्थित म्यू कमला नेहरु शाळेला मदतीचा हात देत रुपडे पालटविले आहे. वर्ध्यात मराठी शाळेला मिळत असलेला हा आधार ऐकून संमेलनाध्यक्ष न्या. चपळगावकर यांनी या शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी शाळेच्यावतीने न्या. चपळगावकर यांचे सपत्निक स्वागत केले. शाळेची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ व कवितांबाबत विचारणा केली. विद्यार्थिनी दिपिका वाघमारे हिने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर केले तर सानिया सिंगणापुरे हिने ‘वंदे मातरम्’ हे गीत म्हटले. या विद्यार्थिनीचे संमेलनाध्यक्षांनी कौतूक केले. यावेळी शिक्षा मंडळाचे सभापती तथा जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, डॉ. वनमाली यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंदांची उपस्थिती होती.
मराठी शाळेला मदतीचा हात, बजाज संस्थेचे केले कौतूक
मराठी शाळांच्या समृद्धतेसाठी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यातूनच म्यू कमला नेहरु शाळेचे दहा लाखांच्या निधीतून रुपडे पालटविले आहे. या शाळेची रंगरंगोटी, टेक्सबेंच, खिडक्या, स्लॅबची वॉटरप्रुफींग आणि किरकोळ दुरुस्ती आदींवर खर्च करण्यात आला आहे. याची माहिती संमेलनाध्यक्ष न्या. चपळगावकर यांना मिळताच त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षा मंडळाचे सभापती तथा जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांच्या सोबत शाळेला भेट देवून पाहणी केली. तसेच मराठी शाळांना मदतीचा हात दिल्याबद्दल जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे कौतुक केले.