मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर; मराठा समाजाला १० टक्के आरक्षण
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी दिलेला शब्द पाळतो. मी शब्द फिरवत नाही. दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. हा मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आहे.
"मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही. मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती. समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय."
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे एक वाक्य आहे 'सब का साथ सब का विकास' आज कुठल्याही दुजाभाव न ठेवता सरकार काम करत आहे. एखादा समाज मुख्य प्रवाहात बाहेर असेल. तर त्याला प्रवाहात आणणे आपली जबाबदारी आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याला सांगतो, ओबीसी किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मी आज राजकीय भाषण करणार नाही.या समाजाला न्याय दिला पाहिजे. सर्वांनी सहकार्य दिले. मी जे काही वचन व आश्वासन दिले होते. ते पूर्ण करत असल्याचा आनंद व अभिमान आहे.
छत्रपतींच्या आशीर्वादाने लाखो मराठा बांधवांसाठी हा दिवस ऐतिहासिक व इच्छा पूर्ती करणारा आहे. कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. आज ही ऐतिहासिक वास्तू या उज्ज्वल परंपरेचा साक्षीदार होत आहे.