"अजित पवारांचा मला फोन आला, त्यांनी शब्द दिला की,..."; संभाजी राजेंनी दिली माहिती
कोल्हापूर | सतेज औंधकर : मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Reservation) वतीने आज अचानक विधानभवनात आंदोलन करण्यात आलं. खासदार संभाजी राजे (MP Sambhaji Raje Bhosale) यांना उपोषणादरम्यान दिलेली आश्वासनं पुर्ण न केल्यानं आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी थेट विधानभवनातील (Vidhan Bhavan) अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन आंदोलन केलं. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकरत्यांना ताब्यात घेतलं. यावर आता खासदार संभाजी राजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
आंदोलनाबाबत समजल्यानंतर खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, समन्वयकांच्या देखील भावना आहेत. तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत. काहीच केलं नाही असं नाही पण, मात्र काही गोष्टी पुढं गेल्या नाहीत. भावना व्यक्त करणं हा तुमचा अधिकार आहे, मात्र कायदा हातात घेऊन कोणती गोष्ट करू नका असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे. तसंच आपल्याला अजित पवार यांचा फोन आला होता. काही गोष्टी कागदोपत्री आहेत त्यावर मार्ग निघाला पाहिजे. उद्या कॅबिनेट बैठक झाल्यानंतर समन्वयकांशी बोलण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, ते पुढे असंही म्हणाले की, सरकारने आदेश दिले की त्याचं पालन करणं अधिकाऱ्यांचं काम आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या अधिकाऱ्यांनी दूर केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. माझी भूमिका समन्वयकाची आहे. लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या तारखा पाळून मार्ग काढा ही माझी अपेक्षा असून, कशा गोष्टी मार्गी लावणार आहात ते उद्या समन्वयकांना सांगा. गरीब मराठ्यांसाठी जे मला करायचं होतं ते मी केलंय असं संभाजीराजे भोसले म्हणाले.