"...कुठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा"; CM शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर मनिषा कायंदेंची टीका
मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत (BJP) जाऊन सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री स्वत: एकनाथ शिंदे झाले. त्यानंतर आता जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र राज्यात अजूनही मंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मागच्या महिनाभरात अनेकदा दिल्ली वारी केली असून, अद्यापही मंत्रीमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे आता मनिषा कायंदे यांनी राज्यातील सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. एकनाथ शिंदे यांना अनेकवेळा दिल्ली वाऱ्या कराव्या लागत असल्यानं राज्याती प्रतिमा मलिन होत असल्याची टीका शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केली जातेय.
शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपसरकारवर अनेकदा निशाणा साधला आहे. त्यानंतर आता त्यांनी ट्विट करुन एकनाथ शिंदेंवर खोचक टीका केली आहे. "छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाऊन सल्ला घ्यावा लागतो यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. कुठे घेऊन चाललात महाराष्ट्र माझा." अशा तिखट शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
सामाना संपादकीयमधून देखील शिंदे सरकारला टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला आता जवळ आला आहे. या प्रकरणी, आपण घाईघाईने मधुचंद्र तर केला, पण लग्नच करायचे विसरलो. अशी शिंदे गटाची अवस्था, असा निशाणा शिवसेनेने सामनातून साधला आहे. मुळात अलिबाबा व चाळीस चोरांची बाजू कायद्याने व नीतीने खरी असती तर एव्हाना संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असता. शपथविधी नाही व शिंदे-फडणवीसांच्या फक्त दिल्ली वाऱ्याच सुरू आहेत. गुरुवारी तर उपमुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीला गेले. इकडे मुख्यमंत्री शिंदे अचानक आजारी पडले. एकतर शिंदे यांना दिल्लीची हवा मानवत नाही किंवा महाराष्ट्राची हवा पुन्हा बिघडली असल्याने शिंदे यांना गुदमरल्यासारखे झाले असावे. लग्न झाल्यावर पाळणा हलला नाही की लोक संशयाने पाहतात व दांपत्यास अनेक सल्ले देतात. शिंदे यांच्याबाबत तेच सुरू आहे.